पुरुषांसाठीही एसटी प्रवासात विशेष सवलत; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा – जाणून घ्या सविस्तर!

ST bus update 2025 : एसटी महामंडळाच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर, मुंबई येथे एक विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या भविष्यासंबंधी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, प्रवाशांना उत्तम सेवा देतानाच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे लक्ष केंद्रित करत, एसटीला देशातील अव्वल क्रमांकाची परिवहन संस्था बनवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे.

सात दशकांहून अधिक काळ सेवा देणारी संस्था

या कार्यक्रमात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी आपल्या भाषणात एसटीच्या सातत्यपूर्ण आणि समर्पित सेवेचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की, गेल्या ७७ वर्षांत एसटीने गावोगावी, आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवून राज्यातील सर्वसामान्य जनतेला एक सशक्त दळणवळण पर्याय दिला आहे.

भविष्यातील दृष्टीकोन – स्मार्ट एसटी

सरनाईक यांनी सांगितले की, दळणवळण क्षेत्रात होणाऱ्या तांत्रिक बदलांना अनुसरून प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सेवा देण्यासाठी ‘स्मार्ट एसटी’ तयार करण्यात येणार आहे. ही एसटी भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असेल.

एसटीचा गौरव – “वाहननामा” व अधिकारी सन्मान

या सोहळ्यात “बस फॉर असं” या संस्थेने तयार केलेले ‘एसटीचा वाहननामा’ हे कॉफी टेबल पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. हे पुस्तक एसटीच्या गेल्या ७७ वर्षांच्या प्रवासाचे चित्रमय दर्शन घडवते.

याचवेळी उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना “अध्यक्ष सुवर्णपदक” देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाचा भाग म्हणून धुळे-नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते, साक्री आगाराचे व्यवस्थापक सुनील महाले, यंत्र अभियंता पंकज महाजन (धुळे-नंदुरबार), सुरेंद्र तांदळे (जालना) व स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे (सिंधुदुर्ग) यांना सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

प्रवाशांसाठी सवलतीची योजना

प्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी एसटीने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. गर्दी नसलेल्या काळात, आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या बस प्रवासासाठी १५% तिकीट सवलत दिली जाणार आहे. ही योजना जुलैपासून लागू होणार असून, ई-शिवनेरीसारख्या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना याचा विशेष फायदा होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment