Kalu Waterfall Accident Viral Video 2025 : पावसाळा सुरू झाला की सर्व सृष्टी बहरून जाते. उन्हाळ्यात कडक्याच्या उन्हामुळे सुकलेली झाडे पुन्हा बहरू लागतात. ओसाड पडलेले डोंगर पुन्हा हिरवे दिसू लागतात. डोंगराच्या कड्या कपाऱ्यातून वाहणारे पाणी सुंदर झऱ्यांचे रूप घेतात. या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी लोक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. झरे, धरण, डोंगर दऱ्या, गड किल्ले यांसारखे निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून जातात. निसर्गाच्या सानिध्यात बागडण्याचा एक वेगळाच आनंद असतो. पण दरवर्षी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना अनेकांचे अपघाती मृत्यूच्या घटना घडतात. कधी अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो तर कधी लोक उत्साहाच्याभरात वाहवत जातात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात एका तरुणीला वाचवण्याच्या नादात एक तरुण पाण्यात पडतो आणि वाहून जातो.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका धबधब्यावरील आहे जिथे काही पावसाळीपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले लोक दिसत आहे. दोरीच्या साहाय्याने काही लोक धबधबा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी दोरीच्या मदतीने धबधबा ओलांडत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो त्यामुळे तरुणीला विरुध्द बाजूस पोहचण्यात अडथळा येतो.
तरुणी अक्षरश: पाण्यात जात असल्याचे दिसते. कसे तरी दुसऱ्या बाजूला पोहचते आणि तिथे उभे असलेले लोक तिला ओढून वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणीला लोक बाहेर काढतात पण तरुणीला बाहेर काढण्यासाठी एक उत्साही तरुण पुढे येतो आणि तोल जाऊन त्या वाहत्या पाण्यात पडतो. पाण्याचा वेग इतका असतो त्याला सावरण्याची संधीच मिळत नाही. तो दोरीला पकडण्याचा प्रयत्न करतो पण अखेर त्याचा हात सुटतो आणि तो पाण्यात वाहून जाताना दिसत आहे.